दाऊद दळवी : अजातशत्रू ज्ञानयोगी





तसे पाहायला गेले तर ७९ या वर्षीकुणालाही मृत्यू यावा ही एक सृष्टी नियमानुसार घडलेली गोष्ट म्हणता येईल. पण काही व्यक्ती आपण समाजाचे काही देणे लागतो या जाणिवेने जीवन जगतात व जीवनाची विविध क्षेत्रे या जाणिवेने समृद्ध करतात. त्याना कुठल्याही वर्षी मृत्यू आला तरी तो सर्वाना चटका लावून जातो. डॉ. दळवींच्या बाबतीत हेच म्हणता येईल.

 

ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्राचार्यापदावरून ते निवृत्त झाले. ! इतिहासाचे प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द महाराष्ट्रभर गाजली.

डॉ. दाऊद दळवी महाराष्ट्रातील एक थोर इतिहासकार होऊन गेले. रटाळ वाटणाऱ्या इतिहासाचे खुमासदार शैलीत सादरीकरण करण्याची वेगळी परंपरा त्यांनी विकसित केली होती. डॉ. दळवींचा जन्म २० जानेवारी १९३७ला कोकणात झाला. त्यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवातच प्राध्यापक म्हणून झाली. पण अध्यापन म्हणजे केवळ पैसे मिळविण्याचे साधन, असे त्यांनी कधीच मानले नाही. आपले कार्य म्हणजे सामाजिक विशेषत: आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कर्तव्य आहे या जाणिवेनेच ते आपले कार्य करत राहिले. ज्ञानदानाच्या या प्रदीर्घ काळात त्यांनी किमान तीन चार पिढय़ांना तरी सज्ञान केले असेल. अव्याहत व्यासंग हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील केंद्रबिंदू होता. म्हणूनच विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी नेहमीच आदर वाटत आला आहे. यामध्ये त्यांचे आजी विद्यार्थीच होते असे नाही तर माजी विद्यार्थ्यांनाही आपल्या गुरूचा विसर अजून तरी पडलेला नाही. विविध कार्यक्रमांत या गुरू-शिष्यांच्या गाठीभेटी होत असत. तेव्हा त्याचे हमखास प्रत्यंतर येत असे.

डॉ. दळवीना केवळ शिक्षण आणि अध्यापनातच रस होता असे नाही. ज्ञानाच्या विविध क्षेत्रात त्यांचा सतत संचार असायचा. अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचा व्यासंगही तसाच सुरू असायचा आणि त्यातूनच त्यांची ग्रंथसंपदा निर्माण झाली. त्यापैकी विशेष उल्लेख करायचा झाल्यास ग्रंथालीनं प्रसिद्ध केलेल्या लेणी महाराष्ट्राचीया ग्रंथाचा करावा लागेल. देशात एकूण १२०० लेणी आहेत. त्यापैकी एकटय़ा महाराष्ट्रात ८०० आहेत, असे सांगून त्याची कारणेही त्यांनी सांगितली आहेत.

सह्य़ाद्रीच्या कडेकपारीतील खडक लेणी कोरण्यासाठी अधिक योग्य आहेत हे त्यांनी सांगितले आहे. हा आणि भारतीय मुस्लीम स्थापत्यकलाहे दोन ग्रंथ लिहिण्यापूर्वी त्यांनी उभा देश पालथा घातला होता. या कलाकृतींमागची प्रेरणा व त्या विषयीचे ऐतिहासिक पुरावे सत्यान्वेषी भूमिकेने गोळा करूनच त्यांनी हे ग्रंखलेखन केले आहे. ऑन द स्लोप्स ऑफ सह्य़ाद्री’, ‘वेध ठाण्याच्या भविष्याचा’, ‘असे घडले ठाणेअशा त्यांच्या सर्वच ग्रंथांचे लेखन या संशोधनाच्या शिस्तीची बांधिलकी स्वीकारूनच झाले आहे. त्यामुळेच ही ग्रंथसंपदा संख्येने कमी असली तरी महाराष्ट्राचे आणि देशाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे.

२००५ मध्ये उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पक्षीय राजकारण सोडले तर त्यांना विविध विषयात आणि क्षेत्रात रस होता. ज्ञानसाधना आणि अध्यापन हे तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य घटक होते. पण इतर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याशी त्यांचा या ना त्या स्वरूपात सहभाग असे. त्यांचा हा विविध क्षेत्रातील संचार धर्म, जात, लिंग इ. भेदांच्या पलीकडे जाऊन होत असे. त्यांच्या मित्रमंडळींमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांपासून, विद्वान, विचारवंत व जनसामान्यापर्यंतच्या सर्वाचा समावेश होता. त्यांचे घर म्हणजे सर्वाचे मीलन केंद्र होते आणि या केंद्रात भेदाभेदांची पादत्राणे बाहेर ठेवूनच सर्व जण स्वखुशीने प्रवेश करत असत. म्हणून त्यांच्या घरी सहज होणाऱ्या मैफली नेहमीच रंगत असत. डॉ. दळवी कुणाशी चर्चा करत असोत वा गप्पा मारीत असोत त्यांच्या ओठांवर एक सूक्ष्म स्मितरेषा नेहमीच असे. मला वाटते ही स्मितरेषा म्हणजे त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक असावे.

असा हा अजातशत्रू ज्ञानयोगी! त्याला ठाणेकरांनी ठाणे शहराचे भूषण मानले नसते तरच नवल. म्हणूनच ठाणे महानगरपालिकेने २००२ साली ठाणे भूषणपुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. इतकेच नव्हे तर पुन्हा एकदा २००७ साली जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार (२००७) सहजीवन फाऊंडेशन, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार (२००९), नगर विकास मंच ठाणे, नगर रचना पुरस्कार (२०१४) अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

त्यांच्या जीवनकार्याचा वेध घेतला तर दोन गोष्टी विशेषत्वाने लक्षात येतात. एक म्हणजे ठाण्यातील विविध संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. महाराष्ट्र साहित्य परिषद, ठाणे या संस्थेचे जिल्हाध्यक्ष होते, तर समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेचेही ते अध्यक्ष होते, तसेच ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षपदही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठाणे महानगरपालिकेने त्यांना हेरिटेज समितीसारख्या महत्त्वाच्या समितीचे सदस्यत्वही दिले होते.

डॉ. दळवींचे कार्यक्षेत्र केवळ ठाण्यापुरते मर्यादित नव्हते. ठाण्यापासून दिल्लीपर्यंत आणि चेन्नईपासून कोलकातापर्यंत त्यांचा संचार होता. दिल्ली येथील हिस्टरी अ‍ॅण्ड कल्चरल सोसायटी, कोलकाता येथील इन्स्टिटय़ूट ऑफ हिस्टरी स्टडी अशा अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांशीही त्यांचे निकटचे संबंध होते.

डॉ. दळवींच्या जीवनाच्या संधिकाळातही त्यांनी सहा वर्षांपूर्वी कोकण इतिहास परिषदेची स्थापना करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक नवे दालन उघडले. कोकण इतिहास परिषदेच्या स्थापनेमागे त्यांची प्रेरणा होती, हे तर खरेच. पण अशी संस्था एखादी व्यक्ती निर्माण करू शकत नाही. तिचे सातत्य टिकविणे तर दूरच राहिले. त्यासाठी समविचारी, अनुभवी व्यासंगी सहकाऱ्यांची फळी उभी करावी लागते. या बाबतीतही डॉक्टरांनी यश मिळविले. माणसे जोडण्याची कला त्याना उपजतच प्राप्त झाली होती. म्हणूनच डॉ. सदाशिव टेटविलकर, रवींद्र लाड यासारखी अनेक विद्वान आणि व्यासंगी माणसे जोडली. प्रा. विद्या प्रभू आणि त्यांच्यासारख्या नव्या दमाच्या सहकाऱ्यांनाही कोकण इतिहास परिषदेच्या कार्याशी जोडून घेतले. या परिषदेच्या वाढत्या यशाचे आणि कार्याचे रहस्य या सर्व समावेशकतेतच आहे.

सुरुवातीची संघर्षांची काही वर्षे सोडली तर दळवींच्या जीवन प्रवासात सतत यशच मिळत गेले. अर्थात त्यांच्या या प्रवासात त्यांच्या सहधर्मचारिणी जमिलाभाभींची त्यांना मिळालेली साथ ही महत्त्वाची आहे. डॉक्टरांच्या जीवन प्रवासातील सर्व बऱ्या-वाईट प्रसंगी जमिलाभाभींनी त्यांना त्यांना नेहमीच हसतमुखाने साथ दिली. या बाबतीतही ते भाग्यवान होते. असा हा सर्वाना हवाहवासा वाटणारा व्यासंगी विद्वान आपल्या विरहाचा सल मागे ठेवून ३१ ऑगस्ट २०१६ला अनंतात विलीन झाला. म्हणून म्हणावेसे वाटते की ,

बडे गौर से सुन रहा था जमाना

तुम ही सो गये दास्ताँ कहते कहते..

 

अब्दुल कादर मुकादम

 


Share on Facebook